अंजनेरी -
बरेच दिवस झाले अंजनेरीला जाणं झालं नव्हतं.. गेल्या काही महिन्यात अनेक वेळेला नासिकला जाणं झालं,, परतीच्या प्रवासात अंजनेरीला जाणं झालं नाही याची हुरहुर लागायची. अंजनेरीच्या ओढी पायी नासिकला अतुल साठेला फोन केला, सह्याद्रित मनस्वी भटकणाऱ्या या माझ्या अवलीया भटक्या मित्राने लगेच होकार दिला आणि ठरली "अंजनेरी - भास्करगड" यांची पण थोडी आडवाटेची दुर्ग डोंगर मोहीम..! आणि मन खूप मागे गेलं!!! साडेचार दशकं... साधारण १९८१ पासून पुढच्या सहा-सात वर्षांचा तो काळ, बऱ्याच वेळेला अंजनेरीला जाणं व्हायचं,,, अगदी तीनही ऋतुत...
एका नजरेत न मावणारा अंजनेरीचा अफाट कडा नेहमी खुणवायचा ! शक्यतो शनिवार गाठायचा प्रयत्न करायचा पण अगदी तो काही नियम नव्हता... त्याकाळी अंजनेरी चढाई आजच्या इतकी सहज नव्हती,,,नाशिक- त्र्यंबकेश्वर एसटीनं अंजनेरी फाट्याला उतरून अंजनेरी गाव गाठायचं मग तिथूनच चढाई करायची!!! वरच्या पायऱ्यांची अवस्था सुद्धा आजच्या सारखी नव्हती,, अनगड पायऱ्या आणि मधेमधे तुटलेला कातळ... खालून आजच्या पायऱ्यांशी पोचेपर्यंतच दम निघायचा,,, हनुमंताच्या जन्माचं या डोंगराशी जोडलेलं नातं कुठंतरी मनात घर करून बसलं होतं.. त्या प्रचंड पठारावर फिरताना हा भाव मनात कुठतरी जागा असायचा...
मग या अफाट पठारावर त्याच्या कुशीतल्या जंगलात, चारही बाजूंनी वर येणाऱ्या वाटांपैकी काही वाटांवर फिरतांना कुठना कुठं आढळणाऱ्या अवशेषात रामायणातले संदर्भ शोधण्याचा प्रयत्न माझ्याच नकळत माझ्या कडूनच व्हायचा ! पण हाती काही लागायचं नाही..
अंजनेरी गावातून छाती वरच्या खड्या चढाने आज जिथे पायऱ्या सुरू होतात तिथपर्यंत यायचं,,,, मग झाडीतल्या नागमोडी वाटेनं - पायरी वाटेनं हनुमंत पावलाच्या तळ्यापर्यंत यायचं, तिथून पुढं कड्याच्या कातळवाटेला लागायचं मग उघडया बोडक्या कातळातल्या अनगड पायऱ्यांनी पठारावर पोचायचं ही पायरीवाट! आज तीच प्रचलीत आहे.. आजकाल तर पायरी वाटेच्या सुरुवाती पर्यंत वाहने येतात...
जसजसा जात राहीलो तसतशा सर्व बाजूंच्या अंजनेरीच्या अनेक वाटा समजू लागल्या त्यातल्या काही वाटांनी चढलो, काही वाटांनी उतरलो,, काही वाटांवर अडलो! काही वाटांवर चुकलो,, काही वाटांमध्ये हरवलो... काही वाटांचा नाद सोडून दिला,, काही वाटा नुसत्याच लांबून बघितल्या पण या सगळ्यात मात्र अंजनेरीच्या अफाट पसाऱ्याचा राबता समजला... किती वाटा कळाल्या!! पायरीवाट - खुंटीचीवाट-गुठलग घळवाट - बेपार जरीचीवाट - गोठराईची घळवाट - तोंड्याची वाट - घुशीची वाट - सुळीची खिंडवाट - कुशेगाव घळीची वाट - कमालीची घळवाट - पाचपायरी वाट अर्थात पलंदवाट/दरवाजाची वाट-पेदीची घळवाट - भसरड घळवाट - मुसळ्याची घळवाट - चिलंगण घळवाट,,,,, वर येणाऱ्या पायवाटांची ही मला कळालेली स्थानिक नांव कदाचित काही वाटांची नावं आणि उच्चार वेगळे असतीलही,,, आणि आणखी काही वाटा असतीलही!!!
यातल्या अनेक वाटांचा राबता आज सुरू आहे की नाही कुणास ठाऊक ? पण या वाटांचे चहूदिशांचे कातळमाथे जोडले तर पूर्ण होईल जणू "अंजनेरी परिक्रमा" ..! असं वाटायचं...
या परिक्रमेनं तेव्हापासून मनात घर केलंय ते आजपर्यंत..!
ऊन्हाळ्याच्या टळटळीत दुपारी अंजनेरी माथ्यावर ऊभं राहील की सह्याद्रीच्या अप्रतिम डोंगर शिखरांचा जणू रत्नहारच समोर ऊभा रहातो... म्हसरुळची चांभार लेणी-फाशिचा डोंगर... -पांडवलेणी-रांजणगिरी किल्ला - गडगडा किल्ला - बहुला किल्ला - पाचपट्टा किल्ला - डांग्या सुळका... आकाश अगदी स्वच्छ असेल तर कळसूबाई शिखर, अलंग मदन कुलंग, कावनई किल्ला, दोर्या डोंगर, सशेरा किल्ला? आणि पहिने नवरा-पहिने नवरी सुळके, ब्रम्हगिरी पर्वत, ब्रम्हा पठार आणि शिखर... इतकेच काय तर हरिहर किल्ला...
तीनही ऋतुतले या साऱ्याचे सौंदर्य शब्दांपलीकडले आहे .. पावसाळ्यात यथेच्छ निथळणारे डोंगरमाथे, सुळके आणि प्रचंड कातळकडे त्यांवरून कोसळणारे शुभ्र जलप्रपात,, सरत्या पावसात अगणित फुलांनी नटलेली पठारे, थंडी आणि धुक्यात हरवलेला आसमंत... उन्हाळ्यात अफाट उंची आणि खोली यांसह सामोरे येणारे कडे आणि दऱ्या...
हे विलक्षण रूप अनुभवावच लागतं,, कोणताही दुर्ग - डोंगर अनेक वाटांनी चढून जाणं, त्याच्या माथ्यावर स्वैरपणे फिरणं,, चहुअंगानी फिरून भोवतालचा आसमंत नजरेत भरून घेणं ही अवर्णनीय अनुभूती असतेच... पण दुर्ग डोंगराच्या कुशी - पायथ्यानं चहुबाजूंनी फिरणं त्याची परिक्रमा करणं हे रोमांचकारी तर असतचं पण डोंगर -दुर्गाची खरी भव्यता,, अफाट उंची - कातळ कड्याची छाती दडपून टाकणारी रौद्रता - दुर्गांची दुर्गमता, त्यांची बलवत्ता - डोंगरांचा राकट कणखर पणा परिक्रमेतच समजतो... म्हणून शक्य असेल तेथे मी परिक्रमेचा प्रयत्न करतो अर्थात सगळीकडे जमतच असं नाही...
अंजनेरीला पूर्वेच्या बाजूने पायरी वाटेने माथ्यावरच्या मंदीरा पर्यंत चढून जाऊन परत अंजनी गुंफे ?पर्यंत खाली येऊन घनदाट झाडीतून दक्षिणेच्या बाजूला शिव पिंडीचे अवशेष ओलांडून बेपारी (व्यापारी ?) घळीतून उतरणे किंवा पश्चिमेला वळून कड्याच्या वरच्या अंगाने पाच पायऱ्यांच्या खिंडीपर्यंत जाणे अनेक वेळेला झाले होते. या खिंडी पासून ही वाट पश्चिमेला पहिने पैकी लक्ष्मण पाड्यात उतरते. पायऱ्यां पासून सुरू झालेली आजची अंजनेरी यात्रा पुन्हा उतरून पायऱ्यांपाशी जाणार नव्हती, पर्वत माथ्यावरच्या अंजनी हनुमंत मंदीरा पासून परत खाली उतरून अंजनी गुंफा आणि हनुमंत पावलाच्या मधून जंगलात शिरून दक्षिणेच्या बाजूला चालू लागलो, शिव मंदीराचे अवशेष ओलांडून घनदाट जंगलातून पाण्यापाशी आलो,, पुढे जंगलातून गवताच्या मोकळ वनात आलो, डाव्या हाताला खाली बेपारी घळ ठेवून तसाच दक्षिणेला चालत जाऊन चढाच्या जंगलात शिरलो,,, ही चढाची वाट दिशा बदलून पश्चिमेच्या बाजूकडे पाच पायऱ्यांच्या खिंडीकडे घेऊन जाते. शेंदूर लावलेल्या अनेक तांदळ्यांची अरण्यातली लोकदेवतांची ही अरुंद खिंड म्हणजेच पाच पायरी ... या खिंडीतून पश्चिमेच्या बाजूला एक घळ उतरते... तीव्र उताराच्या त्या दगडांच्या घळीतून पश्चिमेच्या बाजूला उतरायला सुरुवात केली, जणू पृथ्वीच्या गर्भातला अन्तहीन प्रवास!!
दोन्ही बाजूंच्या प्रचंड कातळकड्यांमधून जाणाऱ्या या वाटेने लक्ष्मणपाड्याच्या दिशेने उतरू लागलो...कड्याच्या अर्ध्यातून उजवीकडे जाणारी जंगलवाट पकडली... समोर पश्चिमेच्या बाजूला उत्तुंग सशेरा किल्ला आणि पहिने नवरा पहिने नवरी शिखरे आणि त्या पलीकडे कलत्या दुपारचा सूर्य आणि आमच्या उजव्या बाजूला अंजनेरीचा पश्चिम बाजूचा अफाट कडा,, या कड्याला घासूनच्या जंगलातून कधी घसाऱ्याच्या तर कधी दगडांच्या वाटेने डाव्या हाताला कड्याची धार अन खोल दरी ठेवत उत्तरेकडच्या अवघड अरण्य वाटेने अंजनेरी परिक्रमा करता येते.... या बाजूने दुर्ग माथ्यावर जाणाऱ्या तशा काही अवघड वाटा वर येतात आणि कड्याच्या खांद्यावरून माथ्यावर पोचतात या आडव्या घळवाटा ओलांडून पाण्याच्या काही कोरड्या प्रपातातून थेट उत्तरेला चिलंगणीच्या घळवाटेला पोचलं की कड्या खालच्या जंगलातून पुन्हा पुर्वेला वळून उत्तरेच्या कड्याला वळसा घालून भर जंगलातून अंजनेरीच्या बाजूने येणाऱ्या पायरी वाटेपाशी हनुमान पावलाच्या पाण्याच्या वरच्या अंगाला पोचता येतं अंजनेरीची ही खरंतर शास्त्र शुद्ध भौगोलीक परिक्रमा!!!
आजच्या अंजनेरी मोहीमेमध्ये अंजनेरी गावापासूनची चढाई - अंजनेरी माथा - परत पायरी वाटेने अंजनेरी गुंफेच्या खालच्या अंगाने जंगलात शिरून पूर्वेच्या बाजूने दक्षिणेकडे पाच पायऱ्यांची खिंड - या घळीतून पश्चिमेला खाली लक्ष्मण पाडा असं पूर्व आणि दक्षिणेला अंजनेरी अनुभवता आला,, याला मी अंजनेरी परिक्रमेच्या ध्यासाची पाऊले म्हणतो.. मनात असलेला परिक्रमेचा पश्चिम आणि उत्तरेचा राहिलेला भाग सारखा मनात रुंजी घालतोय.. तो पूर्ण करण्याचा निश्चय करूनच अस्ताला चाललेल्या भास्कराच्या साक्षीनं लक्ष्मणपाड्याच्या शाळेत पोचलो ,,, दुसरे दिवशीच्या भास्करगडाच्या मोहीमेच्या विचारात!!
डॉ. अमर अडके,
मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर