सह्याद्रिच्या दुर्गम अंतरंगातील अत्यंत अल्पपरिचित डोंगररांगेतली चाकोरीबाह्य अशी "भैरवगड ते गोवारे" भेकरखिंडीतून ही नव्या वळणाची शारीरिक क्षमता आणि संयम यांची परीक्षा पहाणारी वेगळ्या धाटणीची, सह्याद्रिच्या रौद्र सौंदर्याची आणि अस्सल अरण्याची अनुभूती देणारी दीर्घ पल्ल्याची दुर्गम मोहीम पूर्ण करणाऱ्या सर्व मोहीमवीरांचे मनःपूर्वक अभिनंदन.
ज्या पर्वतांमुळे आणि पर्वतीय परिसंस्थांमळे मानवी अस्तित्त्व टिकून आहे... त्या पर्वत, अरण्ये आणि वन्यजीव यांच्या प्रतीकृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून या आडवाटेवरच्या मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते... म्हणूनच मोहीमेदरम्यान एका अपरिचित, अस्पर्श दुर्गम डोंगरावर मैत्रेय प्रतिष्ठान आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशनच्या वतीने पर्वत पूजन करण्यात आले...
सह्याद्रिच्या अंतरंगातील अपरिचित सौंदर्य शोधत नवनव्या वाटा धुंडाळणे त्या वाटांवरली अरण्य संस्कृती आणि लोप पावत चाललेली लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्न करणे हे मैत्रेयचे ध्येय आहे.
डॉ. अमर अडके,
मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर
धार्मिक पर्यटनासह रात्री आणि अप्रतिहत दीर्घ चालण्याचे प्रशिक्षण आणि सायकलींगची कार्यशाळा या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या पदयात्रा आणि सायकल मोहीमेला दिलेल्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच कोल्हापूरासह सांगली, मिरज, कऱ्हाड, अशा सर्वदूर ठीकाणच्या मैत्रेयांच्या सहभागाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
विशेषतः पदयात्रेतील सहभागी स्त्री शक्ति आणि ज्येष्ठांचे विशेष अभिनंदन. पदयात्रा आणि सायकल मोहीम अशा दोन आव्हानात्मक उपक्रमांचे यशस्वी आणि शिस्तबध्द संयोजन करणाऱ्या टीम मैत्रेयचे अभिनंदन. वयाच्या सत्तरीत असणारे आणि सत्तरी पार केलेले सायकल यात्री आणि पदयात्री यांचे विशेष अभिनंदन.
मैत्रेयच्या काही अनोख्या मोहीमांचे आयोजनही येत्या काळात केलेले आहे. त्याचा तपशील योग्य वेळी आपणास सादर केला जाईल. मैत्रेय प्रतिष्ठान या गडकोटांच्या व्यापक चळवळीचे भाग बना आणि मैत्रेयच्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी मैत्रेयचे सभासद व्हा.
आपले,
मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर
मोहीम संयोजन विभाग
मैत्रेयच्या पावनखिंड साहसी रात्र मोहीमेमध्ये सहभागी होऊन त्या पावन शिवमार्गाची अनुभूती घेतलेल्या आणि धारातीर्थी वीरांना मानवंदना देणाऱ्या सर्वांचे कर्तव्य पूर्तीबद्दल अभिनंदन....
पन्हाळगड ते पावनखिंड शौर्य मार्ग हा मैत्रेयचा अभ्यास विषय आहे... वारंवार बदलणारी निसर्ग रूपे, डोंगरकड्यांचे स्खलन, झाडे उन्मळून पडणे, भातखाचरांच्या बदलणाऱ्या जागा, जंगलतोड, नवी बांधकामे, तारांची कुंपणे, वाडया वस्त्यांची बदलणारी रुपे, नव्याने बांधलेली घरे, नव्याने तयार होणारे रस्ते, खाजगी वनक्षेत्रांचा विकास आदी अनेक कारणांमुळे मूळ मार्गात येणारे अडथळे त्यामळे कळत नकळत होणारे मार्गातले अपरिहार्य बदल आम्ही अभ्यासतो आहोत. या साऱ्यांचा अभ्यास करून मूळ मार्गातील अडथळे शोधतो, त्यावर उपाय काढतो, संदिग्धता दूर करतो, त्यासाठी वारंवार पुनर्रेखांकन करतो, परंतु राबता कमी झालेल्या मूळ सिद्ध ऐतिहासिक मार्गाशी प्रामाणिक रहातो आणि थोडं अवघड जातं पण त्याच मार्गाने मुख्य साहसी रात्र मोहीम आणि एक दिवसीय मोहीम करतो.. त्यात एक वेगळं समाधान असतं.. रोमांच असतो मूळ ऐतिहासिक मार्गाची ही परंपरा आणि खडतरता टिकविणे हा आमचा ध्यास आहे आणि तेच मैत्रेयचे वैशिष्ठ्य आहे..... म्हणूनच मार्गाच्या शास्त्रशुद्ध पुनर्रेखांकनासाठी टीम मैत्रेय झटतीय.
आम्ही मैत्रेय, सातत्याने नवनवी आव्हाने स्वीकारून सह्याद्रीतील ज्या डोंगरदऱ्या,दुर्गम गडकोटांवर स्वराज्य साकारले तिथल्या अपरिचित प्रेरणादायी इतिहासाची अनुभूती घेण्यासाठी चाकोरीबाहेरच्या मोहीमा आखत असतो. या आडवाटांवरच्या अभ्यास मोहीमांमध्ये आम्ही मैलोगणती पायपीट करतो, कडे चढतो, खोल अरण्यात शिरतो... कधी धडपडतो, कधी चुकतो, कधी थकतो... पण अखंडपणे ध्येयाकडे वाटचाल करतो... मैत्रेयच्या,गडकोटांच्या अशा चळवळीचा जो मुख्य कणा आहे तो म्हणजे आमचे कणखर आणि कर्तव्यदक्ष संघनायक.... आमच्या प्रत्येक कार्यकारी सदस्य आणि संघनायकांमुळेच मैत्रेयची गडकोट चळवळ प्रवाही आहे. याचीच प्रचिती आपणा सर्वांना या मोहीमेत अनुभवास आली. मोहीमेतील शेवटच्या माणसाच्या सहकार्यापर्यंत हे कार्यरत असतात. म्हणूनच या कार्यकारी सदस्य आणि संघनायकांचा मैत्रेय चळवळीला अभिमान आहे.
मोहीमेचे सारे श्रेय आमच्या या कार्यकारी सदस्य आणि संघनायकांचेच आहे.
डॉ. अमर अडके
मित्रहो,
आपण सर्वांनी पन्हाळा पावनखिंड ही रात्रमोहीम केलीत. त्या अनुषंगाने काही गोष्टी -
माझी ही सरांबरोबरची 6 वी मोहीम. दोन एकदिवसीय व तीन एकरात्रीय मोहीमा मी मैत्रेयांबरोबर याआधी केल्यात. मला प्रत्येक वेळी या मोहीमेनंतर माझ्या अंगात एक नवीन ऊर्जा संचारल्याचा भास होतो. मी स्वतः ट्रेकिंग खूप करतो, मॅरेथॉन्स पळतो, इतर लहान मुलांना घेऊन गडावर जातो. पण या मोहीमेचा अनुभव हा वेगळा असतो.
कारण -
1) हे ट्रेकिंग नसतं. हां, प्रचलित व्याख्येप्रमाणं काहीजण याला ट्रेकिंग म्हणतीलही... पण सरांचे फरसबंदीच्या "शिवाजीची वाट" वरचे ओजस्वी विचार ऐकले की मग याला कोणीही नुसते ट्रेकिंग म्हणणार नाही. सरांबरोबर जे रात्री चालत होते त्यांनी तर किती इतिहास कानात आणि मनात भरून घेतला असेल. कारण सर सलग बोलत असतात.
2) आपण सर्व जणच गडावर जातो, इतरांना घेऊन जातो. पण गडाची, त्याच्या इतिहासाची माहीती आपल्याला स्वतःला किती असते? आपण ती इतरांना किती सांगतो? इतिहासाच्या खुणा बघताना त्या डोळसपणे बघायच्या असतात. हे आपल्याला अडके सरांकडून शिकायला मिळतं. नुसतंच मी 10 किल्ले केले हे सांगण्यात काही विशेष नाही याची जाणीव या मोहीमेत होते.
3) वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही - 350 वर्षापूर्वी महाराजानी एक इतिहास घडवला. त्यांनी तो इतिहास घडवताना अनेक नवीन वेडी माणसे निर्माण केली. ही वेडेपणाची परंपरा अडके सर व सर्व मैत्रेय सदस्य चालवताहेत असं वाटतं.
आपण सर्वांनीही हे वेडेपण थोडं का होईना आपल्या स्वतःच्या मधे आणायचा प्रयत्न करूया. इथून पुढे गड किल्ले पाहुयाच पण ते डोळसपणे पाहुया. आपल्या मुलांना, मुलीना, मित्रांना खरा इतिहास वाचायला शिकवूया. हीच खरी अडके सरांना गुरूदक्षिणा होय असे मला वाटते.
बाजी व फुलाजी प्रभूंच्या विशाळगडावरील दुर्लक्षित समाधीजवळ सरांनी जे सांगितलं होतं तेव्हा माझ्या अंगावर काटा आला होता.
मैत्रेय च्या सर्व सदस्यांनाही त्यांच्या वेडेपणासाठी प्रणिपात ...
मैत्रेयच्या अशाच अनेक "डोळस" इतिहास मोहीमेत आपण परत भेटू ही सदिच्छा .
डाॅ. रावराणे, चिपळूण
"इतिहासाचे सुवर्ण क्षण वेचण्यासाठी अश्या जागांवर यावं लागतं आणि या प्रेरणेच्या गोष्टी ऐकल्या की इथल्या चिमण्यांनाही गरुडाचे पंख फुटतात. इथल्या गवतालाही भाले फुटतात."
- कालच्या मोहिमेतील मला आवडलेले विचार...
या ऐतिहासिक मोहिमेत आम्हाला सहभागी करून कर्तव्य पूर्ती ची संधी दिल्याबद्दल डॉ अमर आडके, सर्व संघनायक आणि मैत्रेय प्रतिष्ठान चे सर्व सदस्य यांचे विशेष अभिनंदन....
आदित्य गोरे, पनवेल
मैत्रेय प्रतिष्ठानच्या एक दिवसीय साहसी पन्हाळगड ते पावनखिंड मोहीमेत सहभागी झालेल्या सर्व मोहीमवीरांचे मनःपूर्वक अभिनंदन. ज्यांनी पाहिल्यांदाच या मोहीमेत सहभागी होऊन मोहीम पूर्ण केली आणि ज्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यांचे विशेष अभिनंदन.
एकदिवसीय मोहीम हे मैत्रेयचे खास वैशिष्ठ्य. पावनखिंड मोहीमांचा चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी आहे. पावनखिंड मोहीमेच्या इतिहासाची वास्तव अनुभूती त्याच्या वैशिष्ठ्य पूर्ण भूगोलासह, ऐतिहासिक स्थळांसह देणे हा मैत्रेयच्या पावनखिंड मोहीमांचा गाभा असतो आणि तो आम्ही कसोशीने जपतो. म्हणूनच मैत्रेयच्या मोहीमा इतिहासाची रोमांचकारी अनुभूती देणाऱ्या असतात.
याच इतिहास आणि त्याच्या भूगोलाच्या अस्सल अनुभूतीच्या ध्यासाने आम्ही सतत अभ्यासपूर्ण आणि प्रयोगशील असतो.. मोहीमांचा अनुभव, अभ्यास आणि प्रयोगशीलतेतूनच अथक प्रयत्नातून साकारली आमची "महाराष्ट्रातील आद्य एक दिवसीय मोहीम" जी आम्ही खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राला आणि शिवभक्तांना समर्पित केली. . .
आम्ही एवढयावरच थांबलो नाही. . . खर तर पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटण्यासाठी श्री शिवाजीमहाराज रात्रीच्या पहिल्या प्रहरी पन्हाळगडावरून बाहेर पडले होते. . . आणि रात्रभराच्या अखंड चालीने दिवस उजडायला पांढरे पाण्यापर्यंत पोचले होते. . . हा इतिहासाचा वास्तव थरार आम्हाला साद घालू लागला. . . आपण त्या रात्र चालीच्या रोमांचाची अनुभूती घ्यायची या ध्येयाने आम्हाला पुरते वेढले. . आणि त्यातून आकाराला आली आमची आषाढ शुद्ध पोर्णिमच्या रात्री पन्हाळगडावरून सुरू होणारी अखंड रात्रभर चालत सकाळी पांढरे पाणी आणि तेथून पुढे पावनखिंडीचा शेवट अशी त्याच रात्रीची, शिवप्रेरणेचा इतिहास जागविणारी, मार्ग, भूगोल आणि इतिहास यांची अस्सल अनुभूती देणारी, पराक्रम गाजवणाऱ्या आणि धारातीर्थी बलीदान केलेल्या ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानवंदना देणारी वैशिष्ठ्यपूर्ण "रात्र मोहीम", हीच महाराष्ट्रातील आद्य रात्र मोहीम होय. जी आम्ही निष्ठापूर्वक गेली अनेक वर्षे सातत्याने आयोजित करतो आहोत. ही मोहीम देखील आम्ही श्री शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून तमाम शिवभक्तांना समर्पित केली. या आमच्या वैशिष्ठ्यपूर्ण मोहीमांना सार्वत्रिक उदंड प्रतिसाद मिळाला. . . शिवभक्तांना या साहस मोहीमेत सहभागी होणे सोयीचे व्हावे अशा विचाराने या वर्षी या रात्र मोहीमेचे आयोजन आम्ही शनिवार दि. २९जुलै रोजी रात्री केलेले आहे. पावनखिंड संग्राम इतिहासाच्या या स्मृती यात्रेत सहभागी होण्यासाठी आपणास हे विनम्र आमंत्रण.
पुन्हा एकदा सर्वांचे एकदिवसीय मोहीमेबद्दल अभिनंदन.
आपले
डॉ. अमर अडके
आणि
मैत्रेय प्रतिष्ठान पदाधिकारी, संचालक , संघनायक
Namaskar,
It was a great Opportunity to be a part of this Campaign. I had a Great experience and learning from this march.
Many thanks to the Organizers and for your Guidance and Support through out the session.
Thanks to co-walkers who Supported one another in one way or the other
Dr. Shubham
किल्ले पन्हाळा ते पावनखिंड : एक रोमांचक अनुभव...
दिनांक 2 जुलै 2023 या दिवशी किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड अशी एक दिवसीय साहसी मोहीम मैत्रेय प्रतिष्ठान कोल्हापूर तर्फे आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये मला दुसऱ्यांदा सहभागी होण्याची संधी मिळाली. मैत्रेय प्रतिष्ठान ही गडकोट, डोंगर-दऱ्या अरण्ये भटकणाऱ्यांची ध्येयवादी चळवळ आहे आणि याच ध्येयवादाने पन्हाळगड ते पावनखिंड अशी इतिहासाची रोमांचकारी अनुभव देणारी साहस यात्रा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. हे वर्ष या मोहिमेचे 41 वे वर्ष आहे. सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या, त्यातील अरण्यांची खडतरता, कोसळणाऱ्या जलधारा बेभान वारा यांची रौद्रता व अंधाराच्या गर्भात दडलेल्या रोमांचकारी इतिहासाची अनुभूती देणारे ही मोहीम दुर्गा अभ्यासक डॉ अमर अडके यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित केली जाते. पन्हाळगड ते विशाळगड रणसंग्राम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमांचकारी पर्व, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू यांचा अतुलनीय पराक्रम व बलिदान आणि शिवा काशिदांचे हौतात्म्य, बांदलांच्या ज्ञात-अज्ञात मावळ्यांचा पराक्रम या साऱ्याने स्फूर्तीदायी ठरलेल्या, सह्याद्री पर्वतरांगेतील अतिशय खडतर आणि थरारक अशा या साहस मोहिमेच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी त्याच पावन मार्गावरून निसर्गाच्या आव्हानात्मक वातावरणात वाटचाल करून या मोहिमेच्या स्मृती दरवर्षी जागवल्या जातात.
मोहिमेच्या कार्यक्रमानुसार पहाटे तीन पंचेचाळीस वाजता किल्ले पन्हाळगड येथे वीर शिवा काशिदांच्या पुतळ्याजवळ सर्व सहभागी शिवप्रेमी चे आगमन व एकत्रीकरण झाले. परभणीहून माझ्यासमवेत माझे अन्य चार मित्र श्रीपाद कुलकर्णी प्रसाद दीक्षित अविनाश कंधारकर व गणेश सूर्यवंशी हे मोहिमेसाठी आलेले होते. तसेच आमच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले इयत्ता दुसरी व पाचवीतील लहान मुले होती. पहाटे साडेचार वाजता आम्ही सर्व शिवप्रेमी वीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना वंदन करून मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे निघालो. पहिला टप्पा मसई पठारावरील मसाई मंदिर येथे होता. पहिल्या टप्प्यांमध्ये तो डोंगरकडा चढताना बरेच जण धडपडले. पण मात्र मसई पठारापासून दुसरा टप्पा मांडलाईवाडी येथे येताना मात्र सर्वजण डॉ अमर अडके यांनी इतिहासाच्या जागवलेल्या आठवणींनी प्रेरित होऊन नंतरच्या टप्प्यांकडे झपाझप पावले टाकत होती. अडके सर, भोसले सर, पाटील सर व मैत्रेय प्रतिष्ठानचे सदस्य सर्व प्रकारे आम्हांला मार्गदर्शन करत होते. अडके सरांनी सांगितलेल्या शिवकालात घडलेल्या रोमांचकारी इतिहासाच्या पाऊल खुणा शोधत धारातीर्थी पतन पावलेल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी या साहस मोहिमेमध्ये सहभागी झालेले शिवप्रेमी यानंतरचा मांडलाई वाडी येथे असलेला दुसरा टप्पा, माळवाडी येथील तिसरा टप्पा व पांढरे पाणी येथील चौथा टप्पा याकडे आगेकूच करत होते. अधून- मधून बरसणारा रिमझिम पाऊस, घनदाट जंगल, खाचखळगे, दगडांची वाट, छोटी फरसबंद वाट, चिंचोळा भाग यातून चालताना चालणाऱ्यांचा कस लागत होता. काही वेळेला पाय घसरत होते. चिखलाच्या ठिकाणी पाय रुतत होते. पण मात्र यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद सर्वांना येत होता. पांढरेपाणी या ठिकाणी शेवटी अडके सरांनी केलेल्या युद्धाच्या प्रसंगी पुन्हा एकदा पाऊस देखील साक्षीदार म्हणून बरसला. दरवर्षी जेव्हा हा प्रसंग अडके सर कथन करतात. त्या त्या वेळी पावसाची हजेरी हमखास असतेच. असा हा रोमांचकारी अनुभव घेऊन सर्वजण पावनखिंड दर्शन व धारातीर्थ पूजन या ठिकाणी आगे कूच करत होते. शेवटी सर्वांनी धारातीर्थ येथे पावनखिंडीमध्ये बलिदान केलेल्या सर्व वीरांना या ठिकाणी पूजन करून मानवंदना देण्यात आली आणि मोहिमेची सांगता झाली.
दरवर्षी नेहमी वेगवेगळा रोमांचकारी अनुभव देणारी ही मोहीम नक्कीच प्रेरणादायी ठरते. गेली 41 वर्षे न थकता डॉ अमर अडके सर व त्यांची पूर्ण टीम या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी झटत असते. इतिहास सर्व स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे ही त्यांची तळमळ त्यांच्या कामांमधून दिसून येते. म्हणून मला असे वाटते की प्रत्येकाने अशा प्रकारची मोहीम जगली पाहिजे, जगवली पाहिजे व टिकवली पाहिजे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा स्वराज्याचा इतिहास पोहोचवला पाहिजे... अर्थातच यात मैत्रेय प्रतिष्ठान आघाडीवर असेल यात तीळमात्र शंका नाही.
सर्व मैत्रेय टिमचे मन:पूर्वक आभार...
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे, हुतात्मा वीर शिवा काशिद व इतर ज्ञात-अज्ञात वीरांना साष्टांग दंडवत...
- प्रसाद वाघमारे, परभणी