Maitrey-Pratisthan-white

सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

॥ श्री राजा शिवछत्रपती ॥

॥ गडकोट, डोंगरदर्‍या, अरण्ये भटकणार्‍यांची एक चळवळ ॥

मैत्रेय प्रतिष्ठान ही गडकोट-डोंगरदर्‍या अरण्ये यांची अभ्यासपूर्ण भटकंती करणार्‍यांची एक चळवळ आहे. मनस्वी भटकण्याची दीर्घ परंपरा असणार्‍या या संस्था नव्हे चळवळीची स्वत:ची काही वेगळी वैशिष्ठ्ये आहेत. महाराष्ट्रात आज प्रसिध्दीस पावलेल्या काही आव्हानात्मक आणि लोकप्रिय मोहीमा या चळवळीने प्रयत्नपूर्वक सिध्द केल्या आहेत. आडवाटेवरचा महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या विलक्षण अंतरंगातील नाविन्यपूर्ण आणि चाकोरीबाहेरच्या मोहीमा आखणे हे या चळवळीचे वैशिष्ठ्य आहे. मग त्या दुर्गांच्या असोत, डोंगरदर्‍यांच्या असोत, डोंगर शिखरांच्या असोत किंवा अरण्ययात्रा असोत...

सन 1983 पासून सातत्याने गेली 37 वर्षे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहीम राबविणारी ही चळवळ आहे. इतका दीर्घकाळ निष्ठापूर्वक पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा आयोजित करणारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी चळवळ आहे. पावनखिंड संग्राम स्मृती यात्रेचे प्रतिवर्षी आयोजन हा या संस्थेचा मानबिंदू आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या एकदिवसीय आणि अखंड रात्र पावनखिंड मोहीमेची सुरुवात ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ ने केली. या मोहीमेचे जनकत्व मैत्रेय प्रतिष्ठानकडे जाते. म्हणूनच ‘महाराष्ट्रातील आद्य एक दिवसीय आणि अखंड रात्र मोहीम’ हे बिरुद आम्ही सन्मानाने आणि अभिमानाने मिरवतो... त्याचा हा मागोवा.

  • सन 1981-82 : मोहीमेच्या ऐतिहासिक, भौगोलिक तपशिलाचा तसेच पूर्वसुरींने केलेल्या मोहीमांचा अभ्यास. त्या आधारे मार्गसिध्दीचे सतत दोन वर्षे अथक प्रयत्न.
  • गोनिदा, बाबासाहेब यांनी साठच्या दशकाच्या उत्तरार्धात केलेल्या मोहीमेच्या वाचन आणि श्रवणाने निर्माण झालेली प्रेरणा, स्वातंत्र्यसैनिक दत्तोबा तांबट स्वातंत्र्य आंदोलनावेळी त्या परिसरात अज्ञात वासात असतांना त्यांनी या परिसरातील पिंजून काढलेल्या खिंडीविषयी ऐकलेली माहिती आणि गुरुवर्य गुळवणी सरांचे अमूल्य मार्गदर्शन. तद्वत 1970 ते 1980 या दरम्यान कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील साहसी शिवभक्तांनी केलेल्या या मार्गावरच्या मोहीमांचे उद्बोधक प्रयत्न या सार्‍यांचा अभ्यास आणि त्यातून मिळालेली स्फूर्ती या सार्‍यामुळे साकारली.
  • सन 1983 साली आमची पहिली ‘पन्हाळा ते पावनखिंड’ मोहीम. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सहकारी बरोबर. मार्गाची दुर्गमता, अननुभव यामुळे वाटेत आंबेवाडी येथे मुक्काम त्यामुळे दुसर्‍या दिवशी पावनखिंडीत पोहोचलो मग हाच प्रघात पडला.
  • दरम्यान प्रतिवर्षी जसजसा अनुभव येत गेला त्या आधारे काही वर्षांनी महाराष्ट्रातील पहिली एक दिवसीय मोहीम सुरु केली. ही आद्य एकदिवसीय मोहीम होय.
  • एक दिवसीय मोहीमेच्या अनुभवावर मग रात्र मोहीमेचे प्रयत्न सुरु.

आणि मग साकारले महाराष्ट्रातील पहिल्या ‘साहसी रात्र मोहीमेचे ’आयोजन. हीच महाराष्ट्रातील ‘आद्य रात्र मोहीम’ होय. मग खर्‍या अर्थाने इतिहास अनुभुतीसाठी रात्र मोहीम विकसित आणि सातत्यपूर्ण आयोजन. हा पावनखिंड मोहीमांच्या प्रवासाचा मागोवा.

गेली तब्बल 37 वर्षे सुरुवातीला दोन दिवसीय, मग एकदिवसीय आणि मग रात्र मोहीम असा पावनखिंडीचा प्रवास व्रतस्थपणे अप्रतिहत करत आहोत.

गडकोटांच्या भटकंतीबरोबरच सह्याद्रीच्या अंतरंगातील प्राचीन घाटवाटांचा अभ्यासपूर्ण मागोवा हा मैत्रेयचा ध्यास. या ध्यासापोटी परिचित, अपरिचित अशा अक्षरश: शेकडो घाटवाटांची भटकंती या चळवळीने केली.

होय, घाटवाटांची भटकंती हे आमचे ध्येय आणि ध्यास... कारण सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांत, दर्‍याखोर्‍यात, त्यातल्या घनदाट अरण्यात निसर्गसुंदर घाटवाटा काळाशी झगडत आपले शतकानुशतकांचे अस्तित्व आजी टिकवून आहेत. कधीकाळी या घाटवाटा इथल्या भूमीपुत्रांच्या जीवनवाहिन्या होत्या. पण रस्ते आणि वाहतुकीची साधने आली आणि या वाटांचे अस्तित्वच पणाला लागले.

देश आणि कोकणाला जोडणार्‍या या वाटा अत्यंत रमणीय आहेत. खोल दर्‍या, घनदाट अरण्यातून जाणार्‍या या वाटांवर सह्याद्रीचे रौद्र लावण्य अक्षरश: मोहवून टाकते ! सह्याद्रीच्या अंतरंगातील अशा अपरिचित आणि आडवाटेवरच्या अरण्यवाटा आम्ही ‘मैत्रेय’ कित्येक दिवस भटकतो आहोत आणि भटकणारही आहोत. कारण या वाटांवरच खरा महाराष्ट्र समजतो. खरा माणूस भेटतो.

सह्याद्रीचे बेलाग कडे, खोल दर्‍या, घनदाट अरण्ये, खळाळत वाहणार्‍या नद्या यातून जाणार्‍या या अरण्यवाटा म्हणजे निसर्गसौंदर्याचा नितातं रमणीय अविष्कार ! आम्हालाही तो अनुभवायचा आहे. आणि त्याची अनुभूती सार्‍यांनाही द्यायची आहे. मनस्वी डोंगर अरण्य भटक्यांना यापेक्षा आणखी काय हवे?

यासाठीच दीर्घकाळ कार्यरत असणारी ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ ही एक चळवळ आहे.

गडकोट भटकंतीबरोबरच डोंगरयात्रा आणि अरण्ययात्रा हे मैत्रेयचे आणखी एक वैशिष्ठ्य. महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीला अनेक पूर्व आणि पश्‍चिम फाटे आहेत. मुख्य सह्याद्री आणि पूर्व-पश्‍चिम रांगांवर अनेक देखणे डोंगर, शिखरे, पठारे, रमणीय दर्‍या आणि या सार्‍यांच्यात भरुन राहिलेली अरण्ये आहेत. ही अस्पर्श शिखरे-अरण्ये-पठारे त्यांच्या नैसर्गिक जीवनाला अनुसरून अनुभवणे हा स्वर्गीय आनंद असतो. अशा निसर्गपूरक अरण्य डोंगरयात्राद्वारे मैत्रेय प्रतिष्ठान निसर्गाच्या अपरिचित सौंदर्याची अनुभूती तर देतेच पण त्याद्वारे या सार्‍यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे प्रबोधनही करीत असते. याला आम्ही दुर्ग-डोंगर-अरण्य साक्षरता मोहीमा असे संबोधतो.

या मोहीमांद्वारे मैत्रेयने आजपर्यंत निसर्गाची अनेक विलोभनीय रुपे उलगडली आहेत आणि त्यांच्या संरक्षणाचे महत्वही पटवून दिले आहे. अशाच मोहीमा आम्ही सह्याद्रीबरोबरच पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या सातपुड्यातही राबवित असतो.

‘इतिहासाला भूगोल असतो’ हा मैत्रेय प्रतिष्ठानचा मार्गदर्शक सिध्दांत आहे. या सिध्दांतास अनुसरून ऐतिहासिक प्रेरणादायी घटनांमागचा भूगोल शोधण्याचा सातत्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. आणि त्याद्वारे ऐतिहासिक युध्दाची, घटनांची भौगोलिक आणि शास्त्रीय मांडणी आम्ही करतो. त्यासाठी विशेष मोहीमांचे आयोजन सातत्यपूर्ण केले जाते. यात पन्हाळगड पावनखिंड मोहीम तर येतेच पण त्याचबरोबर साल्हेरच्या लढाईचा भूगोल, कांचनबारीच्या लढाईचा भूगोल, सिंहगडाच्या लढाईचा भूगोल, सुरतेहून परत किंवा सुरतेस जाताना, प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा भूगोल, उंबरखिंडीच्या लढाईचा भूगोल, दक्षिण दिग्विजयास जाताना अशा अनेक अभ्यास मोहीमा सातत्याने आखल्या जातात.

अबालवृध्दांमध्ये प्रेरणादायी दुर्गप्रेम वाढीस लागावे त्याद्वारे एका सशक्त पिढीची निर्मिती व्हावी या हेतूने दुर्गदर्शनाच्या विविध मोहीमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जाते. उदा. रायगड दर्शन, राजगड दर्शन, सिंहगड दर्शन, पुरंदर दर्शन, तोरणा दर्शन, सिंधुदुर्ग दर्शन, विजयदुर्ग दर्शन, पन्हाळगड दर्शन, सामानगड दर्शन, विशाळगड दर्शन इ.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांच्या गेल्या तीन तपांहूनही अधिक काळच्या भटकंतीमध्ये त्यांनी काढलेली छायाचित्रे, टिपणे, नकाशे त्यांनी संस्थेकडे सुपूर्त केली आहेत. महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील गडकोट, डोंगरशिखरे आणि अन्य अशी तब्बल साडेतेरा हजार छायाचित्रे आज संस्थेकडे जमा आहेत. अत्यंत दुर्मिळ अशी ही छायाचित्रे म्हणजे मूल्यवान संदर्भ ऐवज असून संस्थेने गडभटक्यांसाठी तो उपलब्ध केला आहे.

यातील शेकडो वैशिष्ठ्यपूर्ण छायाचित्रांचे, दुर्गांच्या समग्र माहितीसह ‘गडकोट माझे सांगाती’ या नावाने एक छायाचित्र प्रदर्शनही संस्थेने तयार केले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरात या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

तसेच ज्या लोकांना काही अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष गडकोट भटकंती करणे शक्य नसते अशा तसेच ज्यांना दुर्गांची समग्र माहिती हवी आहे अशा सर्वांसाठी ‘गडकोट माझे सांगाती’ या नावाने विविध दुर्गांचे दृकश्राव्य कार्यक्रम (स्लाईड शो) संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमर अडके हे संस्थेच्या माध्यमातून करीत असतात. त्यांद्वारे प्रत्यक्ष दुर्गदर्शनाची अनुभूती सर्वांनी घ्यावी हा संस्थेचा हेतू आहे.

शास्त्रोक्त पध्दतीने दुर्ग संवर्धन हे संस्थेचे ब्रीद आहे. त्यासाठी ‘दुर्ग स्वच्छतेतून दुर्ग संवर्धन’ हा संस्थेचा विशेष उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत आजवर संस्थेने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन अभियान राबविलेले आहे. त्यापैकी काही अभियाने महाराष्ट्रातील मोठी आणि पथदर्शी उपक्रम म्हणून नावाजली गेली आहेत.

दुर्ग परिसरातील लोकांना दुर्गांचे महत्व पटवून देऊन स्थानिकांद्वारेच दुर्ग संरक्षण आणि संवर्धन हा उपक्रमही संस्थेद्वारे चालविला जातो. तसेच दुर्गांवर येणार्‍या दुर्गप्रेमींना दुर्ग सर्वंकषपणे समजावा यासाठी स्थानिक वाटाडे व मार्गदर्शक तयार करण्याचा एक वेगळा उपक्रमही संस्था राबविते. अनेक किल्ल्यांवर असे मार्गदर्शक (Guide) आणि वाटाडे संस्थेने तयार केले आहेत.

ज्या वाटाड्यांमुळे महाराष्ट्रातील गडभटक्यांना दुर्गम किल्ले आणि अरण्ये यांची भटकंती शक्य होते अशा दुर्लक्षित घटकांचे सन्मान कार्यक्रम संस्था आयोजित करते. अशा वाटाड्यांची समग्र सूचीही संस्थेने तयार केली आहे. आणि ती वेळोवेळी अद्ययावत केली जाते. अशा भूमीपुत्रांचे स्नेहमेळावेही संस्था आयोजित करीत असते. ज्याद्वारे ते समाजासमोर येतील आणि त्यांच्या अनुभव कथनाचा लाभ सर्वांना होईल.

मैत्रेय प्रतिष्ठान ही जशी गडकोट भटक्यांची चळवळ आहे तशीच ती ‘चालण्याचीही चळवळ’ आहे. गडकोट भटकंतीसाठी दीर्घ चालण्याची तसेच डोंगण चढण्याची क्षमता आवश्यक असते. ही क्षमता विकसित व्हावी यासाठी चालण्याचे डोंगण चढणे-उतरणे असे उपक्रमही संस्था राबविते. त्यासाठी कमी अधिक अंतराच्या पदयात्रा आयोजिल्या जातात. उदा. कोल्हापूर ते औदुंबर, कोल्हापूर ते नंदवाळ, कात्यायनी, उजळाई इ. पदयात्रा तसेच संस्थेचे बहुतांश सदस्य आठवड्यातून एकदा कोल्हापूर ते जोतिबा डोंगर चालण्याचा प्रघात अनेक वर्षे पाळतात.

मैत्रेय प्रतिष्ठान ही गडकोट, डोंगरदर्‍या, अरण्ये भटकणार्‍यांची एक विधायक चळवळ आहे. आधी काही तरुण एकत्र आले, भटकू लागले, टिपणे काढू लागले मग भटकण्याच्या कुतुहल आणि उत्साहाची जागा अभ्यासाने घेतली मग तो ध्यासच झाला. मग एक एक सहकारी जमू लागला. मनस्वी भटकणार्‍यांचा एक समूह तयार झाला. मग त्यातून जन्माला आली गडकोट भटकंतीची एक चळवळ ‘मैत्रेय प्रतिष्ठान’. आज ही महाराष्ट्रातील मान्यवर संदर्भ चळवळ बनली याचा आम्हाला रास्त अभिमान आहे.

॥ इदम् शिवाय, इदम् न मम ॥

मैत्रेय प्रतिष्ठानचे सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

मैत्रेय प्रतिष्ठानचे संचालक

डॉ. विश्वनाथ भोसले

उपाध्यक्ष / कोषाध्यक्ष

सुधीर आफळे

उपाध्यक्ष

राजेश पाटील

कार्यवाह

यशपाल सुतार

संचालक

सुचित हिरेमठ

संचालक

अमित बोकील

संचालक

पुरुषोत्तम जामदार

संचालक

शिवप्रसाद स्वामी

संचालक

रितेश मोरे

संचालक

डॉ. विशाल किल्लेदार

संचालक

दशरथ गोडसे

संचालक

उदय कुलकर्णी

संचालक

विश्वास जोखे

संचालक

शैलेंद्र जरग

संचालक

अपुर्वा लोंढे

संचालक

कृपया पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

Scroll to Top