॥ गडकोट, डोंगरदर्या, अरण्ये भटकणार्यांची एक चळवळ ॥
मैत्रेय प्रतिष्ठान ही गडकोट-डोंगरदर्या अरण्ये यांची अभ्यासपूर्ण भटकंती करणार्यांची एक चळवळ आहे. मनस्वी भटकण्याची दीर्घ परंपरा असणार्या या संस्था नव्हे चळवळीची स्वत:ची काही वेगळी वैशिष्ठ्ये आहेत. महाराष्ट्रात आज प्रसिध्दीस पावलेल्या काही आव्हानात्मक आणि लोकप्रिय मोहीमा या चळवळीने प्रयत्नपूर्वक सिध्द केल्या आहेत. आडवाटेवरचा महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या विलक्षण अंतरंगातील नाविन्यपूर्ण आणि चाकोरीबाहेरच्या मोहीमा आखणे हे या चळवळीचे वैशिष्ठ्य आहे. मग त्या दुर्गांच्या असोत, डोंगरदर्यांच्या असोत, डोंगर शिखरांच्या असोत किंवा अरण्ययात्रा...
सन 1983 पासून सातत्याने गेली 37 वर्षे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहीम राबविणारी ही चळवळ आहे. इतका दीर्घकाळ निष्ठापूर्वक पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा आयोजित करणारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी चळवळ आहे. पावनखिंड संग्राम स्मृती यात्रेचे प्रतिवर्षी आयोजन हा या संस्थेचा मानबिंदू आहे. महाराष्ट्रातील पहिल्या एकदिवसीय आणि अखंड रात्र पावनखिंड मोहीमेची सुरुवात ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ ने केली. या मोहीमेचे जनकत्व मैत्रेय प्रतिष्ठानकडे जाते. म्हणूनच ‘महाराष्ट्रातील आद्य एक दिवसीय आणि अखंड रात्र मोहीम’ हे बिरुद आम्ही सन्मानाने आणि अभिमानाने मिरवतो... त्याचा हा मागोवा.
फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा.
फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या डोंगररांगांतून कोकणात आणि देशावर वहाणाऱ्या अनेक नद्या उगम पावतात... कोकणात उतरणाऱ्या पश्चिमवाहिनी तर देशावर वहाणाऱ्या पूर्वप्रवाही...
एकाच डोंगर धारेवर बिलगून पडणारे पावसाचे थेंब एकमेकांचा निरोप घेतात आणि एक थेंब पोचतो सिंधु सागरात (अरबी समुद्र) तर दुसरा बंगालच्या उपसागरात विशाळगडाच्या घेऱ्यातल्या माचाळच्या साक्षीनं मुचकुंदीतला थेंब पूर्णगडाजवळ अरबी समुद्रात विलीन होतो तर त्याच नभातल्या जलाचा थेंब श्वासाच्या अंतरावर कासारी, पुढे शाळी कडवीतून पंचगंगेचा हात धरून कृष्णेच्या उदरातून बंगालच्या उपसागरात पोचतो... काजिर्ड्याच्या अंतरंगात वाघोठण उगम पावते आणि विजयदुर्गाच्या पहाऱ्यात सिंधु सागरात मिसळून जाते...
अशा विलक्षण भूगोलाच्या वेगळ्या अंतरंगाचा वेध आम्ही मैत्रेय अनेक दशके घेत आहोत... आडवाटेवरच्या या भटकंतीमध्ये कोल्हापूर पश्चिमेच्या अशा अठ्ठावीस लहान मोठ्या नद्यांचे उगम आणि प्रवाह आम्ही मैत्रेयानी अनुभवले आहेत. त्यातलाच एक प्रवाह पुन्हा साद घालतोय म्हणून निघालो आहोत त्याला भेटायला... त्याच आडवळणावर... कोरोनाच्या जागतिक संसर्गाचे सर्व आरोग्य नियम पाळून... रविवारी लवकर...
सह्याद्रि हा काही चारदोन शिखरांचा... एक दोन कड्यांचा नाही तर... अंसंख्य गिरीशिखरे... शेकडो घाटवाटा... आणि श्री शिवरायांच्या अभेद्य दुर्गांचा आहे.
या दृढ संकल्पनवर आम्ही मैत्रेय भटकतो... सह्याद्रि हा आमचा सखा... सोबती उभं आयुष्य फिरलो तरी तो संपणार नाही आणि संपूच नये . . . .
डॉ. अमर अडके
मैत्रेय प्रतिष्ठान
फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा.
डॉ. अमर अडके लिखित "सह्याद्रिच्या गिरिशिखरांवरून" या पुस्तकाची कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कारासाठी निवड
सप्रेम नमस्कार,
म.सा.प. तर्फे पुस्तक निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या, कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कारासाठी डॉ. अमर अडके लिखित "सह्याद्रीच्या गिरिशिखरावरुन" (भाग-१ व २) या "अक्षर दालन" ने प्रकाशित केलेल्या साहित्य कृतीची म.सा.प. च्या निवड समितीने, पुरस्कारासाठी आलेल्या ३५ पुस्तकांमधून, यंदाच्या पुरस्कारासाठी "सह्याद्रिच्या गिरिशिखरांवरून" या पुस्तकाची निवड एकमताने केली आहे. मनापासून अभिनंदन!! रोख गौरवधन, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ गुरुवार दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी, सायंकाळी पाच वाजता, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ख्यातनाम साहित्यिक मा. राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते व म.सा.प. चे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात होणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी, या समारंभाला आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
धन्यवाद !!
बंडा जोशी,
कार्यवाह, म.सा.प. पुणे
नाव : डॉ. अमर अनंत अडके
जन्म : 25 मार्च 1964
छंद :
छायाचित्र प्रदर्शन
गेली 37 वर्षे महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील गडकोटांची भटकंती सुरू आहे. ‘चारशेचोपन्न’ किल्ले आजपर्यंत पायी फिरून अभ्यासले आहेत. हे किल्ले़ त्यांची रचना़वैशिष्ठये़ इतिहास़ आसमंत यांसह छायाचित्रित केले आहेत. अशी दुर्मिळ तेराहजार छायाचित्रे आजपर्यंत काढली आहेत. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झालेले हे हे गडकोट म्हणजे आपली स्फूर्तीस्थळे आहेत. त्यांचे दर्शन आबालवृध्दांना व्हावे़ त्यांच्यात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी या हेतूने यातील निवडक छायाचित्रांचे एक भव्य प्रदर्शन तयार केले.
दुर्ग स्वच्छतेतून दुर्ग संवर्धन
‘दुर्ग स्वच्छतेतून दुर्ग संवर्धन’ हा संस्थेचा विशेष उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत आजवर संस्थेने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन अभियान राबविलेले आहे. त्यापैकी काही अभियाने महाराष्ट्रातील मोठी आणि पथदर्शी उपक्रम म्हणून नावाजली गेली आहेत. दुर्ग परिसरातील लोकांना दुर्गांचे महत्व पटवून देऊन स्थानिकांद्वारेच दुर्ग संरक्षण आणि संवर्धन हा उपक्रमही संस्थेद्वारे चालविला जातो.
दृकश्राव्य कार्यक्रम (स्लाईड-शो)
ज्या लोकांना काही अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष गडकोट भटकंती करणे शक्य नसते अशा तसेच ज्यांना दुर्गांची समग्र माहिती हवी आहे अशा सर्वांसाठी ‘गडकोट माझे सांगाती’ या नावाने विविध दुर्गांचे दृकश्राव्य कार्यक्रम (स्लाईड शो) संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमर अडके हे संस्थेच्या माध्यमातून करीत असतात. त्यांद्वारे प्रत्यक्ष दुर्गदर्शनाची अनुभूती सर्वांनी घ्यावी हा संस्थेचा हेतू आहे.